दळीता कांडीता
25-26 या पर्वती क्लबच्या नवीन वर्षातील पहिल्या कार्यक्रमाला प्रसिध्द मराठी स्री वादी कवियत्री /लेखिका अंजली कुलकर्णी यांचे दळीता कांडीता या विषयावर व्याख्यान झाले.
व्याख्यानाचा विषय पूर्वीच्या काळापासून ते सांप्रत काळापर्यंतच्या मराठी कवियत्रींची कविता असा होता. अंजली ताईंनी 23 पुस्तके लिहीली आहेत ज्यात ललीत लेख ,वैचारिक लेख,अनुवादीत कादंबरी आदीचा समावेश आहे.यांना राज्य सरकार व साहित्य परिषद व इतर संस्थांकडून पुरस्कार प्राप्त झाले आहे.व त्यांच्या कवितेचा सरकारने अभ्यासक्रमात सामावेश केला आहे. भाषणात त्यांनी स्त्रियांच्या कवितेचा प्रवास उलगडतांना सांगितले की या परंपरेचे मूळ तिसर्या शतकापासून सुरू झाली व ती भरजरी व समृध्द केली गेली.पण पुरूषाच्या बरोबर पहिली कविता बाईने कधी म्हटली याचा उल्लेख नाही हे नमुद केले. दळताना,ताक घुसळतांना,मुलाला झोपवताना बायका जे गुणगुणत त्यातूनच काव्याची निर्मिती झाली. उदा:- फुलात फुल जाईचे सुख भोगावे आईचे अश्या गुणगुण्याने काव्याची निर्मिती झाली असावी.सकाळी उठून काय काय मी केले (घरातील सर्व कामे यात गुंफत असत). यात मंगळागौरी ची पण गाणी आली.या गाण्यात सासूरवाशीण माहेरचे कौतूक करीत असे.व सासरला गौण मानीत असे.एका गाण्यात तर सासरचा वैद्य फाटके कपडे घालून यायचा तर माहेरच्या वैद्याचे भरजरी कपडे व पागोटा घालून यायचा.अशी गंमत असायची. महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामींची शिष्या महादई ही चक्रधर स्वामींना प्रश्न विचारायची त्या वेळी बायकांना ज्ञान घेण्याची मुभा नव्हती. त्या काळात जनाबाई,मुक्ताबाई,सोयराबाई, कान्होपात्रा यांनी काव्यात भर घातली.जनाबाई संत नामदेवांच्या घरी दासी होती.पण तिचे बरोबरीचे स्थान होते.विठ्ठल हा तिच्या लेखी मित्रच होता. ह्यांनी देवाला माणूस पणाला आणले. गणिका असलेली कान्होपात्रा विठ्ठलाची भक्ती करायची. बादशहाकडून बोलाविणे आल्यानंतर "नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा जाउ पाहे" असा धावा करून विठ्ठल मंदिरा समोरच प्राणत्याग केला. विचाराने समृध्द असलेली मुक्ताबाई योगाभ्यासाची मोठी अभ्यासू होती.वयोवृध्द गुरू चांगदेव ( अंदाजे 1400 वर्षे वयाचे असताना) मुक्ताबाईने त्यांना अहंकाराबद्दल फटकारले होते.ज्ञानदेव समाजाच्या टोमण्यांनी उद्विग्न झाले असताना ताटी उघडा ज्ञानेश्वरा या काव्यात योगी हा जनांचे अपराध सहन करतो हे सांगितले.
ब्रिटीशांचे आगमन काळ
ब्रिटीशांनी इंग्रजी शिक्षण आणले त्यामुळे संपूर्ण जगाची ज्ञानाची कवाडे उघडी झाली व स्त्री कल्याणाचा काळ सुरू झाला. सावित्री बाई फुले या उत्तम कवियत्री होत्या.(काव्य फुले हा त्यांचा काव्य संग्रह 1932) त्या म्हणतात इंग्रजी माउली आली आणि माणसाचे पशुत्व नाहिसे झाले. लक्ष्मीबाई टिळक यांची भरली घागर (1930) चा काव्यसंग्रह प्रसिध्द आहे. बहिणाबाई चौधरी या काव्यप्रांतातील लखलखणारे नक्षत्रच होय.माय सासरीच का राहाते याचे त्यांनी मोठे समर्पक उत्तर दिले आहे .त्या म्हणतात लेकीच्या मायेसाठी माय सासरी राहते. म्हणजे लेकीला माहेरचे प्रेम मिळावे म्हणून माय सासरी राहाते. नंतरच्या काळात ईंदिरा संत,संजीवनी मराठे, शिरीष पै'अनुराधा पोतदार या कवियत्रीं होत्या.अनुराधा पोतदार यांनी कवितेतून एक आडदांड पुरूष जो बायकोचा सन्मान करील व तिला योग्य तो मान देईल समाजाला योग्य तो संदेश दिला. ईंदिरा संतानी आपल्या कवितेद्वारे माणूस हरविल्याची खंत व्यक्त करतात.
कवियत्री शांता शेळके या वक्त्यांच्या परिचयाच्या होत्या.शांताबाईंनी एकसे एक सरस गाणी दिल्यात "तोच चंद्रमा नभात"व "असेल मी नसेल मी" किंवा रेशमाच्या धाग्यांनी ही गाणी विसरणे शक्यच नाही.तसेच त्यांनी वेली वरची एक कळी अश्या बालकविता पण लिहील्या आहेत.अरूणा ढेरे या पण समवयस्क कवियत्री अहेत.
1975 ते 1985 या काळात स्री मुक्तीची लाट आली.तो काळ स्त्री वाद, सबली करण व सक्षमी करणाचा होता.या काळात मल्लिका अमर शेख,रजनी परूळेकर,डाॅ.अश्वीनी धोंगडे,आसावरी काकडे,आणि विमल ताई ह्या कवियत्रींनी कवितेची रचना केली.विमल ताईंची एक रचना आहे . घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती ही प्रसिध्द रचना विमल ताईंना न विचारताच लोक जाहिरातीत वापरत आहेत.
शेवटी वक्त्यांची स्वरचित कविता बदलत गेलेली सही या कवितेने कार्यक्रमाची सांगता झाली. सही म्हणजे स्वत:ची ओळख शाळेतली सही नंतर फाॅर्म भरताना,नोकरीत व बॅंकेत केलेली सही या प्रत्पेक वेळी काळानुसार सहीचे स्वरूप बदलले.व वृध्दापकाळी पेशन साठी सही करताना हात थरथरतो म्हणून बॅंकेचा तरूण क्लार्क अंगठा उठवायला सांगतो. यात आपली स्वत:ची ओळख कशी बदलत जाते याचे मार्मिक चित्रण आहे.
एवढ्या काळानुसार कवियत्रींची माहिती व त्यांची रचना श्रोते मंत्रमुग्ध होउन ऐकत होते.