Editor
Rtn. Shubhangi Mulay
May-2025
District Governor
Rtn. Shital Shah

रोटरी क्लब ऑफ पेण Back

 

स्पर्श संस्कारांचा

रोटरी क्लब ऑफ पेण

रोटरी क्लब ऑफ कळंबोली

रोटरी क्लब ऑफ रोहातर्फे विशेष विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी RYLA शिबिर

रोटरी क्लब ऑफ पेण, कळंबोली आणि रोहा तर्फे दिव्यांग मतिमंद विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले उन्हाळी शिबिर हे केवळ कौशल्यविकासाचे नव्हे, तर संस्कार, संवेदनशीलता आणि एकात्मतेचा अनुभव देणारे ठरले. RYLA (Rotary Youth Leadership Awards) या उपक्रमाअंतर्गत आयोजित या विशेष शिबिरात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना योगा, ड्रॉइंग, क्राफ्ट अशा सृजनात्मक व शरीरसामर्थ्य वाढवणाऱ्या गोष्टी शिकवण्यात आल्या. याशिवाय विशेष मुलांसाठी सुसंगत खेळांची मांडणी करण्यात आली होती. या खेळांमधून विद्यार्थ्यांनी सहभाग घेत फक्त मनोरंजनच नव्हे तर समवयस्कांमध्ये सुसंवाद व सहकार्याची भावना अनुभवली.

या शिबिरात एक विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांनाही विविध खेळांमध्ये सहभागी करून घेण्यात आले. यामागील हेतू असा की, शिक्षकांनी दिव्यांग विद्यार्थ्यांचे जगणे समजून घ्यावे, त्यांच्या अडचणी अनुभवाव्यात आणि त्यांच्या आत्मविश्वासाची खरी जाणीव व्हावी. हे अनुभव निश्चितच शिक्षकांसाठी अंतर्मुख करणारे ठरले.

भावस्पर्शी क्षणअथर्वशीर्ष पठण:

शिबिरातील आणखी एक भावस्पर्शी क्षण म्हणजे विशेष विद्यार्थ्यांकडून करून घेतलेले अथर्वशीर्ष पठण. ही मुले दिव्यांग असली, तरी संस्कार आणि श्रद्धेची जाणिव त्यांच्या मनात खोलवर रूजलेली आहे, याचा प्रत्यय या पठणातून आला. काही विद्यार्थ्यांनी अथर्वशीर्ष उत्तम प्रकारे पाठ करून, स्पष्ट उच्चारांसह सादर करून सर्वांची मने जिंकली.

शिक्षक सेविका यांचा सन्मान:

या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षक आणि सेविका (आईं) यांच्या मेहनतीची दखल घेत, रोटरी क्लबजतर्फे त्यांना साड्या भेट देण्यात आल्या. हा एक लहानसा पण मनापासून केलेला सन्मान होता, ज्यातून रोटरी क्लबजने त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.

सहभोजनाचा स्नेहमिलन:

शिबिराचा शेवट विशेष आनंददायी ठरला – विद्यार्थ्यांबरोबर सहभोजन. रोटरी क्लबजच्या सदस्यांनी या दिव्यांग विद्यार्थ्यांबरोबर बसून जेवण केले. या सहभोजनातून समतेचा, स्नेहाचा आणि आपुलकीचा एक अनमोल संदेश सर्वांपर्यंत पोहोचला.

शिक्षकांची प्रतिक्रिया:

"या मुलांकडून आम्ही दररोज शिकतो. पण आजच्या खेळांमधून त्यांच्या जगण्याची झुंज प्रत्यक्ष अनुभवली. त्यांच्या प्रत्येक हसण्यात एक प्रेरणा दडलेली आहे. रोटरी क्लब ऑफ पेण आम्हाला नेहमीच मदत करतो, परंतु आज त्यांच्यासोबत रोटरी क्लब कळंबोली आणि रोहा यांनीही आम्हाला मदतीचा हात दिला आम्ही सर्वांचे विशेष आभार मानतो."

श्री. सिद्धांत म्हात्रे, विशेष शिक्षक

विद्यार्थ्याची भावना:

"मला योगा आणि चित्रकला दोन्ही खूप आवडली. मी अथर्वशीर्ष पाठ केले, सर्वांनी कौतुक केले म्हणून खूप आनंद झाला."

उमर, विशेष विद्यार्थी