आयडियल स्टडी App प्रोजेक्ट -
मोबाईल हा मुलांचा अतिशय आवडता साधन बनलेला आहे. त्यामुळे मोबाईलवर अन्य काही पाहण्यापेक्षा त्याचा उपयोग शिक्षणासाठी केला तर? ऐकण्यापेक्षा किंवा वाचण्यापेक्षा काही गोष्टी प्रत्यक्ष पाहिल्यास त्या अधिक परिणामकारक ठरतात व कायमस्वरूपी लक्षात राहतात. यालाच दृश्य परिणाम असे म्हणतात.
याच विचारातून प्रेरणा घेऊन Prism Solution, पुणे यांनी Ideal Study App ही संकल्पना विकसित केली आहे.
हे Ideal Study App म्हणजे नेमकं काय? -
तर, हे अॅप दहावीच्या विद्यार्थ्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे!
या अॅपमध्ये दहावीच्या सर्व विषयांचे संपूर्ण पाठ्यक्रम समाविष्ट आहेत. प्रत्येक पाठावर आधारित शिक्षणात्मक व्हिडिओज तयार करण्यात आले आहेत, जे अत्यंत समजावून सांगणारे आहेत. त्यात पाठांवरील प्रश्नोत्तरे, पत्रलेखन, निबंधलेखन, कवितांचे रसग्रहण, व्याकरण, गणित, विज्ञानातील प्रयोग व इतर विषय सोप्या पद्धतीने शिकविण्यात आले आहेत. याशिवाय करिअर मार्गदर्शनपर लेख सुद्धा उपलब्ध आहेत.
Prism Solution या अॅपची बाजारमूल्य किंमत खासगी पातळीवर पालकांना रु. एक हजार ते एक हजार शंभर दरम्यान घेतली जाते. पण आपण रोटेरियन हेच अॅप विद्यार्थ्यांना एक रुपयाही न घेता मोफत देत आहोत.
या उपक्रमामागे एक उत्तम योजना -
या उपक्रमाचे यशस्वी नियोजन लिटरसी डायरेक्टर रो. वसंतराव माळुंजकर यांनी केले आहे. त्यांनी क्लबांना या प्रकल्पासाठी आर्थिक योगदान देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत रोटरी क्लब प्रिस्टीन आणि रोटरी क्लब निगडी यांनी प्रत्येकी दहा हजार रुपये देऊन पुढाकार घेतला.
त्यानंतर इतर सर्व क्लब्सना केवळ प्रत्येकी पंचवीस रुपये इतक्या कमी दराने अॅप पुरविण्यात आले, त्यामुळे याची एकंदर किंमत व्यवस्थित जुळवून आली.
यशस्वी अंमलबजावणी आणि व्यापक लाभ -
आजपर्यंत सत्त्याऐंशीहून अधिक रोटरी क्लब्स यांनी हे अॅप खरेदी करून दहावीच्या विद्यार्थ्यांना वितरित केले आहे. आतापर्यंत जवळपास वीस हजारहून अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा थेट लाभ झाला आहे. अजूनही अनेक क्लब्सकडून या अॅपसाठी मागणी येत आहे.
लिटरसी टीमचा पुढाकार -
जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे अॅप पोहोचावे यासाठी लिटरसी टीम सातत्याने प्रयत्नशील आहे.
वर्षाच्या सुरुवातीला, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. संतोष मराठे यांच्या शपथविधी समारंभाच्या दिवशी सुमारे पन्नास क्लब प्रेसिडेंट्सना हे अॅप औपचारिकरीत्या सुपूर्त करण्यात आले.
वितरणाची पद्धत आणि अॅपचा उपयोग -
विद्यार्थ्यांना हे अॅप देताना एक कार्ड दिले जाते. त्या कार्डवर अॅपची लिंक व पासवर्ड असतो. प्रत्येक विद्यार्थ्याचा पासवर्ड वेगळा असतो. पासवर्ड टाकल्यावर लिंक ओपन होते आणि त्यानंतर माध्यमाचा पर्याय विचारला जातो. विद्यार्थी ज्या माध्यमाचे असेल, तो पर्याय निवडल्यास त्यानुसार संपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध होतो.
मराठी, इंग्रजी आणि सेमी इंग्रजी अशा तिन्ही माध्यमांतील विद्यार्थ्यांसाठी हे अॅप उपयुक्त ठरते.
इतर क्लब्सनी सहभाग घ्यावा
असे अॅप हवे असल्यास कृपया लिटरसी डायरेक्टर रो. वसंतराव माळुंजकर यांच्याशी संपर्क साधावा.
रो. ममता कोल्हटकर
चेअरमन, हॅपी स्कूल
(लिटरसी विभाग)
रोटरी वर्ष २०२५–२६