Rotary Club of Katraj Back

All poems by Rtn Pradeep Sindekar:

All Paintings are by Annet Aishwarya Kulkarni Dabake

कोणी

कर्म घडवण्या खपून असती कोणी

धर्म बदलण्या टपून बसती कोणी

हत्येचा हा बनाव 'काफिर' म्हणुनि

मुहोबतिचे दुकान टाके कोणी

संगत त्यांची नको नको रे देवा

फसगत करण्या लपून बसतो कोणी

नांगर धरुनि कर आईची सेवा

काळी माती जपून असतो कोणी

झाकून डोळे नको ठेवू विश्वास 

लुटून नेण्या छपून बसतो कोणी

वरवरचे ते हास्य लाघवी वाटे

अंतरी हे कुढून बसती कोणी

प्रदीप जे का वरी भासती शांत

राग मनी अन धुपून असती कोणी 

गाभुळे स्वप्न

का संध्येच्या कातरवेळी

हे फुलून आले गाणे

नक्षत्र चांदणीचे 

हे फूलपाखरू झाले

तळपते चांदणी वरती

वळणावर अंधा-या

आडवा उंबरा जणु की

हे फूल गुलाबी झाले

श्वासात माळला चाफा

मोगरा उशाशी येई

निःशब्द भावनांची

पालखी घेउनि गेले

बागेश्री हलके हलके

जी तान सोडुनी देई

तक्रारी प्रणयाच्या 

हे गाणे विसरुन गेले

स्पर्श रेशमी अवघा

मोरपिसाच्या वाणी

स्वप्न गाभुळे ओठी

मना मोहरून गेले

 
ठाऊक आहे

ठाऊक आहे मला अजूनही

रात्र सणकत आहे

वेदनांच्या मागोव्यातून

गात्र ठणकत आहे

किना-यावर अंधाराच्या 

पहाट होडी नांगरलेली 

नव्या दिसाच्या घुंगराची 

किणकिण खणकत आहे

आठवणींनी नव्या जुन्या 

शाल आहेस विणलेली

अनुभवाच्या चांदण्या जोड

वस्त्र दणकट आहे

*'उद्या'* पलिकडे परवा आहे

शक्यतांनी भरलेला 

*'आज'* साजरा कर प्रदीप

*'उद्या'* खुणावत आहे

 

उचल एक पाऊल

उचल एक पाऊल 

सख्या रे

उचल एक पाऊल 

तुला कशाला हवा ताण रे

नको कज्जा कांगावा रे

उचल एक पाऊल 

वीर तू

उचल एक पाऊल 

नको बघू तू उंच पर्वता

छाताडावर नको कडा हा

अंतर अवघे चालून जाशील

फक्त तू

उचल एक पाऊल 

चालू दे

उचल एक पाऊल 

किती वादळे

किती उन्हाळे

किती पचवल्या

काजळ रात्री

किर्र झाडीच्या

अंधारातून

भीती पचवली गात्री 

तिथे तरी पण

तुला सोडवी 

फक्त एक पाऊल 

 धीराने 

उचल एक पाऊल 

 

अपमानांच्या किती दलदली

गुदमरला रे श्वास

पाठीमागे भोचक नजरा

अडचण करती खास

असो वंचना जरी आजची

आत्मभानचि

खरी शिदोरी

उचल एक पाऊल 

गड्या रे

उचल एक पाऊल 

हरणारा ही तूच सर्द रे

विजेता ही तूच मर्द रे

अखंड कात्री

जीवन यात्री

उचल एक पाऊल 

प्रवाश्या

उचल एक पाऊल

 

हदयामध्ये दबून गेली किती वादळे

लाचारीने नडून गेली किती वादळे

-हदया मध्ये दबून गेली किती वादळे।।1।।

खपली खाली अजून वाहे लाव्हा अविरत।

कोट छातीचा करून गेली किती वादळे।।2।।

शतकांपासून साधे पण मी धरून आहे।

रक्त संयमी करून गेली किती वादळे।।3।।

अतीव होतो संयम जेव्हा माझ्या मित्रा

घोंगावुन ही गिळू पाहती किती वादळे।।4।।

विष डंख नको पण फुत्काराला सोडू नको रे।

फुत्काराने गळून जातील किती वादळे।।5।।

या देशी जी तळपून  गेली तेग शिवा ची।

धर्मा वरची पळून गेली किती वादळे।।6।।

प्रदीप कांही जगापासूनि बोध घेई तू।

करी सामना येवो फिरुनि किती वादळे।।7।।

 

हवी

कडाडणा-या बिजलीसंगे बरसणारी धार हवी

बडबडणा-या वल्ह्यांसोबत संथ शांत मझधार हवी

फूल गुलाबी नाजूक कोमल झुलते अवखळ वा-यासंगे

कीटक हल्ला थोपवण्या परी काटे ल्याली शाल हवी

मुसमुसणा-या यौवनास या नवतेचा मधुमास मिळे

कितीक वादळे झेलील अंगी ऐसी पण मग शिस्त हवी

तुटती तारे क्षणाक्षणाला गगना मध्ये

पिढ्या पिढ्या

स्थिर चांदणी दिशा दर्शना कुठेतरी पण ध्रुव हवी

ओढून घेती हव्यासाने माझे माझे म्हणती ते

कण क्षणाचा व्यय करण्या मज दातृत्वाची धमक हवी

 

नम

उछलती मुस्कान तेरे चेहरे की

कभी थम ना जाए ।

खिलखिलाती धूप तेरे चेहरे पे

कभी कम ना आए।

हौसला बना रहे जवान, ऐसेही सालों तक

झरना ए फुर्ती बहता ही रहे, कभी जम ना जाए। 

बनता रहे माहौल तेरा, यारी और दोस्ती का

बरसती रहे खुशी खुशहाली, कभी गम ना आए।

पर लगे उड हवामें जन्नतोंके हूर सी   

आंधियोंके डर से,  कभी दम ना जाए। 

सहर के पलका सदका है मांगा यही प्रदीप 

आंख से उम्मीद की तेरी कभी नम ना जाए।

 

कोजागरी

धुंद हळव्या भावनांचि रंगली कोजागरी

सूर शिंपुन मारव्याचे रंगली कोजागरी

चंद्र आहे त्या नभी की बैसला साथीस या?

हात हाती घेतला नि रंगली कोजागरी

बकुळ चाफा मोगरा की सायली फुलते इथे?

गंध अंगी पेटला नि रंगली कोजागरी

रंग ऐसे भाळले की धनु इंद्राचे मी पेलले

अंग अंगी रंग पसरून रंगली कोजागरी

 ओठ प्यासे विलगलेले गात्रे अवघी चेतली

चेतनांना चेतवोनि रंगली कोजागरी

भावनांना शब्द नेहमी अपुरे पडती प्रदीप 

शब्द परत्या भावनांनी रंगली कोजागरी