माझी बाबागिरी
जानेवारी २०११. रोटरीमध्ये एका शैक्षणिक प्रकल्पाच्या सादरीकरणासाठी मला MCCIAला बोलावलं होतं. ती मीटिंग संपल्यावर, माझ्याशेजारी बसलेले रोटरी इंटरनॅशनलचे नियोजित अध्यक्ष कल्याण बॅनर्जीं यांनी मला विचारले, “तू रोटरी का जॉईन करत नाहीस? रोटरीला तुझ्यासारखे कार्यकर्ते हवेत.”
तोपर्यंत रोटरी नक्की काय करते याची विशेष कल्पना मला नव्हती. पण रोटरी अध्यक्षांच्या शिफारशीनंतर, जुलै २०११ मध्ये मी विधिवत रोटेरियन झालो. पहिल्याच वर्षी क्लबमध्ये बेस्ट रोटेरियनचा पुरस्कार व डिस्ट्रिक्टमध्ये आरडीईपीसाठी बेस्ट प्रोजेक्टचा पुरस्कार अशी दणक्यात सुरुवात माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.
मागील १४ वर्षांत, माझे सर्व क्लब अध्यक्ष व सर्व प्रांतपाल, हे माझे आधारस्तंभ तसेच प्रेरणास्त्रोत्र राहिले आहेत. त्यांच्या प्रोत्साहन आणि पाठिंब्यामुळे मला शेकडो क्लब्स व अनेक रोटरी प्रांतांच्या प्रशिक्षण शिबिरांना जाऊन माझे कार्य सादर करण्याची संधी मिळाली. आजपर्यंत अनेक GG तसेच छोट्यामोठ्या प्रकल्पांतही सहभागी होता आले. “सक्षम” ह्या आमच्या प्रकल्पाला २०१७ साली रोटरी इंटरनॅशनलकडून सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचा प्रतिष्ठित पुरस्कारही मिळाला. या कालावधीत ४ वर्षे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी व ६ वर्षे अवॉर्ड्स कमिटीवर “बाबा बिरेन’च्या भूमिकेतून काम करत असताना, आपल्या प्रांतातील सर्वोत्तम प्रकल्प नजरेखालून गेले व त्यातून खूप शिकायला मिळाले.
ग्रामीण भागातील गरजू शाळा व मराठी विद्यार्थ्यांसाठी काम करणे हाच माझा व्यवसाय असून, त्यासाठी प्रभावी ओळखी व शिफारस गरजेचे असतात. मी कायम रोटरीच्या ४-वे टेस्टला धरून काम केले. त्यामुळे, आमच्या कार्याला ९ रोटरी प्रांत व ४००हून अधिक क्लब्सचा पाठिंबा मिळाला. रोटरीने मला भारतातील आणि भारताबाहेरील हजारो समविचारी रोटेरियन्ससोबत जोडले जे ग्रामीण शिक्षणाबाबत माझ्याइतकेच भावनिक होते. आज माझ्या कंपनीतर्फे ४०,०००हून अधिक डिजिटल क्लासरूम्स महाराष्ट्राच्या प्रत्येक दुर्गम गाव-तालुका-जिल्ह्यातील शाळांमध्ये कार्यरत आहेत. पण त्यासाठी माझ्या आरंभकाळात रोटरीने दिलेला हातभार व विश्वास हा खूप महत्त्वाचा टप्पा होता. माझे संवाद कौशल्य, तर्कसंगत विचारशक्ती आणि नेतृत्व विकसित होण्यात रोटरीचा सिंहाचा वाटा आहे.
माझी पत्नी प्राचीने रोटरी आयडॉल व गीत गायन स्पर्धेत विजेतेपद मिळवले व वेगवेगळ्या क्लब्ससाठी यशस्वी फंडरेजर कार्यक्रम घेतले. तिचे वंदे मातरम हे गाणे हे भारतातील अनेक रोटरीच्या कार्यक्रमांना वाजवले गेले व रोटेरियन्सचा भरपूर स्नेह तिला मिळाला. रोटरीत असताना, तिला तिची कला सादर करण्याच्या अनेक संधी मिळाल्या.
गेली १४ वर्षे रोटरीने माझ्यात आमुलाग्र बदल घडवले. त्यामुळे या संस्थेकडे मी आत्मीयतेने-बांधिलकीने बघतो. फाउंडेशनला निधी देणे किंवा सेवा प्रकल्पांमध्ये सहभागी होणे या चौकटीत मर्यादित न राहता रोटरीत काही धोरणात्मक व भविष्याभिमुख बदल व्हावेत म्हणून मी माझे विचार वेगवेगळ्या व्यासपीठांवर मांडत असतो. प्रवाहाविरुद्ध पोहणे, प्रचलित व्यवस्था किंवा विचारांना आव्हान देणे हा खडतर प्रवास आहे. पण माझ्या रोटरीला मी हे देणे लागतो.
नवीन रोटेरियन्सना माझा मोलाचा सल्ला आहे. आपल्या कुवतीनुसार सहभागी व्हा. आपले ज्ञान, कौशल्य, वित्त, वेळ रोटरीसाठी गुंतवा. यातून तुम्हाला मिळणारा परतावा बहुआयामी व अनेक पटीने असेल. एंजॉय रोटरी!
रो. बिरेन धरमसी,
रोटरी क्लब ऑफ पुणे स्पोर्ट्स सिटी