सेवा, आनंद व प्रगती म्हणजे रोटरी
रोटरी मध्ये येऊन १ जानेवारी २६ रोजी मला ३४ वर्षे पूर्ण होतील.
१९८९-९० या काळात माझा मित्र सुधीर ह्याच्या तोंडी नेहमी रोटरी चे नावं असायचं. 'आज इथे गेलो, परवा तीकडे जायचे आहे, धमाल असते' वगैरे तो नेहमी सांगायचा. मग जिज्ञासापोटी मी रोटरी क्लब ऑफ पुणे गणेशखिंड या क्लब च्या कोजागिरी पौर्णिमेच्या मीटिंग ला गेलो. दोन महिने काही मीटिंग अटेंड केल्यावर थोडी गंमत, मजा वाटली व २६ जानेवारी १९९१ रोजी माजी प्रांत पाल कै विठ्ठलराव यांच्या घरी मला रोटरी ची शपथ व पिन देऊन मला सभासदत्व दिले गेले.
तिथे माझी भेट माजी प्रांतपाल कै सुभाषभाई सराफ यांच्याशी झाली. ते माझ्या गावचेच असल्याने एक आपुलकी निर्माण झाली. मी मीटिंगला गेलो नाही की त्याच रात्री त्यांचा मला फोन यायचा. 'तू का नाही आलास मिटींगला! पुढच्या मिटींगला ये' आणि साहजिकच मी प्रत्येक मीटिंगला हजर राहू लागलो. कधी पाहुण्यांची ओळख तर कधी आभार प्रदर्शन करायला सांगत असल्याने सुरवातीला वाटणारी भीती कमी झाली. प्रोजेक्ट साठी इतरांबरोबर जाऊ लागलो. खेळीमेळीचे वातावरण असल्याने मी व रेखा रोटरीत रमू लागलो. प्रत्येक मीटिंगला हजर राहू लागलो.
१९९५ मध्ये गणेशखिंड क्लबने व्होकॅशनल लिटरसी वर एक सेमिनार घेतला आणि त्यात मला एक स्किट सादर करायला सांगितले. आता पर्यंत कधीही एकही ओळ न लिहिणाऱ्या नाना ने चक्क functional illiteracy वर एक स्किट लिहून सादर केले.
मग मागे वळून बघितले नाही. कॉलेज मध्ये नाटकात भाग घेतला होता. नंतर नोकरीत त्याला विसर पडला पण रोटरीत येऊन नाट्यवाचन, एकांकिका,गीत गायन स्पर्धा या द्वारे थांबलेली हौस पूर्ण करता येऊ लागली. कै सुभाष भाई नी त्यांच्या गव्हर्नर च्या काळात म्हणजे२००२-०३ मध्ये ' नाना तूच मला क्लब चा अध्यक्ष पाहिजे' असा अग्रह धरून ते वर्ष यशस्वी केले. काही मतभेदांमुळे रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटी चा जन्म झाला. नवीन क्लब काढण्यासाठी किमान २५ सभासद आवश्यक होते. ते होण्यासाठी डिस्ट्रिक्ट मधील पहिला क्लब झाला त्यात जवळ जवळ ८०% सभासद हे पती पत्नी होते. ढोल लेझीम व पालखीतून क्लब चे चार्टर्ड आणले गेले.
मला अध्यक्षपदाचा अनुभव असल्याने सन२००५-०६ मध्ये काही कारणांमुळे रेखाला रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीची अध्यक्ष व्हावं लागल. मी २०१२-१३ ला रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीचा अध्यक्ष झालो.
२०१७-१८ मध्ये आमच्या रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटी चे प्रांतपाल अभय गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेली डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स ही अत्यंत वेगळी व अविस्मरणीय झाली. यात प्रत्यक्ष भाग घेता आल्याने खूप काही शिकता आलं, अनुभवता आलं. याचाच उपयोग माजी प्रांतपाल पंकज याने त्याच्या कॉन्फरेन्स मध्ये माझ्या कडून करून घेतला.
२००३ पासून ते आतापर्यंत जवळ जवळ प्रत्येक वर्षी मी डिस्ट्रिक्टच्या कोणत्या ना कोणत्या तरी कमिटीत काम करीत आहे.गेल्या तीन वर्षांपासून डिस्ट्रिक्ट मध्ये लर्निंग चा अनुभव निरनिराळ्या क्लब मध्ये देत असल्याने मूळच्या माझ्या प्रशिक्षण देणाऱ्या पिंडाला प्रशिक्षण देताना खूप समाधान लाभत आहे.
रोटरी मध्ये निरनिराळे फेलोशिप ग्रुप्स असतात. रोट दिलीप कुंभोजकर यांच्या मुळे Rotarians Referral Network( RRN) मध्ये २०१६-१७ मध्ये प्रवेश झाला. २०२०-२१ मध्ये मीRRN चा चेअरमन असतांनाच RRN ही RMBPBC झाली व जगातील १०० वा RMB चा फेलोशिप ग्रुप म्हणून रजिस्टर्ड झाली. झाली. MCCIA इथेआम्ही दर शनिवारी सकाळी भेटतो व एकमेकांना व्यवसाय देतो व घेतो.
रेखा हिचा साड्या विकण्याचा व्यवसाय वाढण्यात RMBPBC ची खूप मदत झाली. पुण्यातील बहुतेक सर्व क्लब मध्ये तिचे ग्राहक आहेत. IFRM ह्या गाण्याच्या आंतराष्ट्रीय फेलोशिप ग्रुपचा सभासद झालो व मागील वर्षी डायरेक्टर म्हणून आनंदही घेतला.
माझा मुलगा व मुलगी रोट्रॅक्टर होते व आता मुलगा राघवेंद्र सिंहगड क्लबचा ह्या वर्षी मेम्बरशीप डायरेक्टर आहे.
१९९१ ते आता पर्यंत रोटरी ने मला काय दिले अस जर कोणी विचारलं तर मला खूप छान निरनिराळ्या क्षेत्रातील मित्र मिळाले. कॉलेज जीवनात एकांकिका, नाट्यवाचन, गाणी, वक्तृत्व स्पर्धा हे करणे जमले नाही त्या गोष्टी मला रोटरीत नव्याने करता आल्या. माझ्या विचारात, राहणीमानात खूप छान बदल झाला. नेतृत्व गुण विकसित झाले. परदेशात, समाजात, मित्र मैत्रिणीनं मध्ये मान सन्मान मिळाला.
अजून माणसाला जीवनात समाधानी आयुष्य जगण्यासाठी अधिक काय हवं असतं!
रो.प्रदीप (नाना) पाटील
रोटरी क्लब ॲाफ पुणे युनिव्हर्सिटी