असा एकटेपणा हवासा
शांत दुपारी
हळूच यावा घरात माझ्या
मिटून जावे जग बाहेरील
आणि खुलावी आत कवाडे
असा एकटेपणा हवासा..
दरवळणारे मंद मंदसे
अत्तर होउन,
खोल्यांमधुनी,
झुळकीसरसा वहात जावा ...
पसरत जावे आणि धुंदसे,
त्याचे मायाजाल बिलोरी
असा एकटेपणा हवासा...
गुणगुण त्याची
निःशब्दातुन ऐकू यावी
झणकारावे गाणे
गात्रांतून..अनाहत..
पुस्तकातली पाने उलटत
मेजावरल्या,
इथे बसावे त्याने अलगद
मऊ गारशी दुलई त्याची
ओढुन घ्यावी
तना- मनावर
नको चहा अन्य नको बिस्किटे
पिऊन घ्यावे
मलाच त्याने...
..अस्तित्वाचे माझ्या व्हावे
पीस मखमली,
तरंगताना स्थळकाळावर.
आणि सरावी
जाणिव सारी...अस्तित्वाची...
असा एकटेपणा हवासा...
रो.स्नेहल भट
रोटरी क्लब ऑफ बाणेर