PDG Ravee Dhotre Article Back
माझ्या रोटरी कॉन्फरन्स प्रवासाची आठवण

१९९२ सालाची गोष्ट. रोटरीत येऊन मला दोनच वर्षे झाली होती. सालाबादप्रमाणे आमच्याकडे कॉन्फरन्सला कोण येणार याची चर्चा सुरू झाली. त्या वेळी कॉन्फरन्सला ७०० ते ८०० रुपये खर्च यायचा. एवढा खर्च करून मिळणार काय, हा मध्यमवर्गीय विचार मनात येताच. मी आयुष्यात कधी माईक हातात घेतला नव्हता. आपल्या खर्चाने इतरांचे वक्तृत्व ऐकायला सांगितले तर कोण येईल, या विचारापोटी मी जायचे नाही असे ठरवले.
पण आमचे घसर बाळासाहेब धारप यांनी असा दम भरला—“यावेळी घसर असा दम भरायचा की जायचेच लागेल.” सेम इराणी प्रांतपाल आणि कॉन्फरन्स बालगंधर्व रंगमंदिरात. सर्वसाधारणपणे दुपारच्या जेवणानंतरचा एक तास हा किमान उपस्थितीचा मानला जातो. आणि जेवणानंतरचे भाषण होते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे.
या नावातच एक जादू होती. स्वतः सेम इराणी जेवण अर्धवट सोडून दोन वाजता व्यासपीठावर आले, तर बाबासाहेबांनी संपूर्ण शिवशाही व्यासपीठाचा ताबा घेतला. त्यानंतरचा दीड तास बालगंधर्व रंगमंदिर रोटेरियनसाठी अपुरा ठरला—तेथे फक्त आणि फक्त मावळेच उरले होते. उभे राहण्यासाठीही जागा नव्हती.
आपल्या अभिनयातून स्त्री सौंदर्याचे अनोखे दर्शन घडवणाऱ्या बालगंधर्वांच्या नावाने पूजनीय झालेल्या व्यासपीठावर, आपल्या सामर्थ्याने स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारी शिवशाही बाबासाहेबांनी अशा पद्धतीने मांडली की प्रत्येक जण स्वतःला मावळा समजू लागला. हा एक वेगळाच अनुभव होता.
पुणेकर असल्यामुळे लहानपणापासून शनिवारवाड्यावरची अनेक भाषणे ऐकली होती, पण रोटरीच्या व्यासपीठावरचा हा अनुभव मनावर कोरला गेला.
यानंतर दरवर्षी या अनुभवाची शिदोरी वाढतच गेली. इराणींच्या नंतर करणींची कॉन्फरन्स बालगंधर्वलाच झाली—ती ९६ साली. त्या कॉन्फरन्सचे उद्घाटन होते केंद्रीय मंत्री वसंतराव साठे यांच्या हस्ते. साधारणपणे राजकारणी माणूस अध्यात्मावर बोलू शकत नाही, हा माझा समज त्या दिवशी खोटा ठरला. एक तास वसंतरावांनी ज्ञानेश्वर आणि रोटरी फाउंडेशन यांच्या विचारसाधनांची संस्कृत, मराठी व इंग्रजी—सर्व भाषांत इतकी सुरेख मांडणी केली की त्या वेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले Rotary Foundation Trustee डिकॉस्टा यांनी उभे राहून त्यांना आलिंगन दिले.
त्या क्षणी मला प्रश्न पडला—मी रोटरीच्या कार्यक्रमात आहे की वसंत व्याख्यानमालेत?
यानंतर सुधीर गाडगीळांची मिश्कील मुलाखत असो, की रांगड्या नाना पाटोकरांची आदिवासी भागातील सेवा—प्रत्येक भाषण म्हणजे एक वेगळाच अनुभव ठरला.
अशाच एका कॉन्फरन्समध्ये संध्याकाळच्या खास कार्यक्रमात खणखणीत आवाजात कुणीतरी मला जवळ बोलावले. ओळख नसलेल्या त्या ज्येष्ठ व्यक्तीशी काय बोलावे, या विचारात असतानाच त्यांनी मला त्यांच्या शेजारी बसवले.
“मी बाळासाहेब सानो नारायणगाव रोटरी,” अशी ओळख करून देत त्यांनी माझ्या पाठीवर अशी सणसणीत थाप मारली की मला रामदासांच्या ‘नारायण’ची आठवण झाली. पुढची वीस मिनिटे ते माझ्याशी गप्पा मारत राहिले. एका ज्येष्ठ सभासदाला नव्या सभासदाबद्दल इतकी संवेदनशीलता असू शकते, हे मला बाळासाहेबांकडून पाहायला मिळाले.
नारायणगावला बाळासाहेबांच्या शेतावर थांबल्याशिवाय माझी गाडी कधी पुढे गेली नाही. हा दिलदार मित्र मला कॉन्फरन्सने दिला.
या पहिल्या तीन-चार कॉन्फरन्सनी मला भरपूर मित्र दिले, आणि एका कॉन्फरन्सने तर चक्क हातात माईक दिला. आयुष्यात पहिल्यांदा बोलण्याचा तो प्रसंग होता—विषय होता Pleasure of Giving. समोरून काय प्रतिसाद येईल याची कल्पनाच नव्हती. मुद्दे विसरलो तर काय, विषयांतर झाले तर काय—भीती होती. पण समोर न पाहता बोलत गेलो.
माझ्यासमोर पहिल्याच रांगेत एक ज्येष्ठ सभासद बसले होते. छातीवर दिसेल अशा थाटात टाळ्या वाजवत होते. धोतर-जब्बा, खादीचा थाट, पांढरे शुभ्र केस, झुबकेदार मिश्या. ‘साठी’ हा शब्द इथे वयापेक्षा इतिहासाशी जास्त जोडलेला वाटतो—आणि त्यांच्याकडे पाहताना सौंदर्यशास्त्राची जाणही आहे असे वाटले.
नंतर कळले की ते रोटरी पुणे साउथचे डॉ. दादा कंर्डीकर होते. आजतागायत दादांची ती कौतुकमिश्र नजर मी विसरलेलो नाही. अशीच कौतुकाची थाप देण्यात आमचे भाईसाहेब कुडळे आणि प्रमोद जेेजुरीकर पुढे असतात.
सन २०१९-२० मध्ये प्रांतपाल म्हणून जेव्हा कॉन्फरन्स सादर करण्याचा अनुभव आला, तेव्हा तोही वेगळाच होता—किमान खर्चात उत्कृष्ट वक्ते, चविष्ट भोजन, संध्याकाळची मैफल… ही सारी आव्हाने आमच्या क्लबने स्वीकारली. पुणे नॉर्थ, जोंधळा साथ, पाषाण क्लब व पनवेल सेंट्रल क्लब यांनी मोलाची साथ दिली.
यानंतर झोन ७ चा रोटरी कोऑर्डिनेटर म्हणून तीन वर्षे महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा, आंध्र प्रदेश व कर्नाटकातील १० जिल्ह्यांच्या २२ कॉन्फरन्सला जाण्याचा योग आला. अनेक मित्र मिळाले. ही सारी शिदोरी आज एक खजिना बनली आहे.
एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली—या भागात मातृभाषेला प्रचंड मान दिला जातो. इंग्रजीचे स्तोम माजवले जात नाही.
आजतागायत ३५ वर्षांत जवळपास ५० कॉन्फरन्स मी अनुभवलेल्या आहेत. या सर्व मित्रांकडून एकच गोष्ट शिकलो—आपण जेव्हा जेव्हा काही बोलतो, तेव्हा त्या बोलण्यातून चांगल्या विचारांची देवाणघेवाण होते का, हे पाहावे. प्रत्येकाने असे ठरवले, तर अनेक आवाज गप्प होतील. कारण नेमके तेच बोलावे लागते—वाचनातून चिंतन, चिंतनातून मनन.
आपल्या गप्पांतून लावालावी किती, निंदानालस्ती किती, आणि समृद्धता किती—याचा विचार केला तर सगळेच योग्य वाटते. मनाशी गाठ बांधायला शिकवणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यांचीच अपेक्षा कायम कमी असते. म्हणून कॉन्फरन्सला जाताना आपण देणाऱ्याच्या भूमिकेत राहिले पाहिजे.

पीडीजी रवि धोत्रे