रोटरीचा चढता आलेख
माझ्या नोकरीतील कारकिर्दीस आता 53 वर्षे झाली आहेत. आपल्या संघटनेचे वैशिष्ट्य म्हणजे रोटरी सतत प्रगतिशील राहिली आहे. दर तीन वर्षांनी भरणाऱ्या COUNCIL ON LEGISLATION द्वारे नियम बदल होतात तसेच RI चे विश्वस्त धोरणात्मक बदल करतात.
पूर्वी कोणताही प्रकल्प त्या वर्षांतच पूर्ण करावा, पुढील क्लब पदाधिकाऱ्यांवर तो बंधनकारक नसावा असा नियम होता. 1985 मध्ये सुरू केलेल्या पोलिओ निर्मूलन मोहिमेपासून दीर्घकालीन प्रकल्पांना प्रारंभ झाला.
आपण करतो त्या समाजसेवेची प्रसिद्धी करू नये, आपल्या सेवाकार्याच्या परिणामांमुळे जनता रोटरी कडे आकर्षित व्हावी हीच अपेक्षा होती. त्यामुळे आपले सेवाकार्य जनतेपर्यंत न पोहोचता, रोटरीची 'रोटी'क्लब अशी टिंगल व्हायची. पोलिओ निर्मूलन मोहिमेमुळे प्रसिद्धीची आवश्यकता जाणवली. त्यातूनच आजची Public Image कमिटीची निर्मिती झाली.
सध्या अमेरिका व युरोपीय देशांत सभासद संख्या कमी होत असताना आशियाई देशांमध्ये उच्चशिक्षित तरुण पिढी मोठ्या प्रमाणात रोटरी कार्याकडे आकर्षित होताना दिसते. आपल्या प्रांतातील उदाहरण द्यायचे झाल्यास तळेगावासारख्या निमशहरी भागात पाच रोटरी क्लब उत्तमप्रकारे कार्यरत आहेत.
Strategic planning द्वारे पुढील काळातील समाज गरजा लक्षात घेऊन प्रकल्पांत सलगता, सातत्य राखणे शक्य होते. त्यातच CSR FUND योजनेद्वारे औद्योगिक संस्था सामाजिक उपक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात मदत देऊ लागल्या. स्वतः करण्यापेक्षा रोटरी मार्फत प्रकल्प केल्यास सर्व रक्कम योग्य कामासाठीच खर्च होते हा अनुभव आल्याने रोटरी क्लबनाही समाजोपयोगी मोठे प्रकल्प घेणे शक्य होते. त्यामुळे अगदी खेड्या-वाड्यांतही आपल्या सामाजिक कार्याबद्दल जाणीव व विश्वास निर्माण झाला आहे.
या प्रगतिपर वाटचालीत नकारात्मक भूमिका पहावयाची झालीच तर एखादं दुसरे उदाहरण देता येईल. क्लबमधील हजेरीचे महत्त्व कमी केल्याने साप्ताहिक सभांना उपस्थिती अगदी कमी असते. परिणामी चांगले कार्यक्रम आयोजिण्यात अडचणी येतात. तसेच इतर क्लब सभांना उपस्थित राहून तेथील सभासदांशी स्नेहबंध वाढवणे जवळपास संपलेच आहे. दुसरे म्हणजे बहुसंख्य सभासदांतील रोटरविषयक ज्ञानाचा अभाव! अनेकांना तर आंतरराष्ट्रीय संघटना, प्रांत व क्लब यांच्या कामकाजाविषयी काही घटना (Constitution) असते याचेही ज्ञान नसते. एखाद्या युवक/गणेश मंडळांप्रमाणे कारभार चालतो.
एकंदरीत, रोटरीची ही प्रगतिपथावरील वाटचाल चालूच राहो आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य व शांतता प्रस्थापित करण्यात रोटरीचा बहुमोल वाटा असो हीच शुभेच्छा!
माजी प्रांतपाल .दीपक चैतन्य गंगोळी
रोटरी क्लब ऑफ तळेगांव दाभाडे