रोटरी क्वीन - सौंदर्य स्पर्धेच्या निमित्ताने..
Back
18-19 वर्षांपूर्वी जेव्हा माझ्या लग्नाचा विषय सुरु होता. भरपूर स्थळ सांगून येत होते त्यातच एक स्थळ बाबांना आवडलं विशेषतः मुलगा.. तसाही लग्नाचा निर्णय मी बाबांवर सोडला होता.. पण अगदी 2-3 दिवसांच्या आतच बाबांच्या कानावर आलं.. मुलाची बहीण म्हणतेय, "मुलगी दिसायला फार काही विशेष नाही. पण इतर सगळ्या गोष्टी लक्षात घेता विचार करूयात." ऐकून बाबा विलक्षण संतापले, "लोकांच्या सौंदर्याच्या व्याख्याच वेगळ्या आहेत. अशा घरी नाहीच द्यायचं मला माझ्या हर्षदाला." आईशी बोलताना मी सगळं ऐकलं. थोडी नाराज झाले. प्रत्येकवेळी आई मला समजवायची पण ह्यावेळी मात्र माझं उदासपण बाबांना खूप खटकलं.. मला जवळ बसवून म्हणाले, "तू जगातील सगळ्यात सुंदर मुलगी आहेस आणि तुझं सौंदर्य सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. सर्वसामान्य माणसाला तुझं सौंदर्य कळणं शक्यच नाही."
मला समजत होतं. बाबा माझ्यातील उदासपण दूर करायचा प्रयत्न करीत होते.
"हे सगळं ठिक आहे बाबा.."
"पण तरीही तुला सांगतो.. एकदिवस तू सिद्ध करणार कीं तु सुंदरच आहेस."
"बर्रर्रर्रर्र.." बाबांना ताण येऊ नये म्हणून मी हसण्यावर नेलं.
"हसू नकोस.. काय माहित भविष्यात ब्युटी क्वीन ही होशील.. कारण तु मनात आणलंस तर काहीही करू शकतेस ह्याचा मला चांगला अनुभव आहे आणि तेवढाच प्रचंड विश्वास देखिल.." बाबांनी हसून जवळ घेतलं..
"ब्युटी क्वीन.. क्या ठाकूर.. मजाक कीं भी हद होती है.." नेहमीप्रमाणे बाबांच्या पोटावर भुक्की देत मी हसले.
किती सहजपणे बोलले होते बाबा.. पण त्यांचा माझ्यावरील विश्वास सत्यात उतरेल ह्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती..
जेव्हा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मंजू फडके यांच्या हस्ते Queen चा Crown मिळाला.. तेव्हा बाबांची फार कळवळून आठवण झाली.. आणि त्यांचा विश्वास सत्यात उतरवल्याचा तेवढाच आनंद देखिल..
आणि ह्याचं संपूर्ण श्रेय जातं ते रोटरीला.. डिस्ट्रिक्ट कॉन्फरेन्स मध्ये अशी भव्य आणि नावीन्यपूर्ण स्पर्धा घेणाऱ्या डिस्ट्रिक्ट कल्चरल टीमचे खूप खूप आभार आणि यशस्वी स्पर्धा घेतल्याबद्दल अभिनंदन.
रोटरी क्वीन 23-23
रो हर्षदा बावनकर, RCP हेरिटेज